My creations: poetry in Marathi: विचार कल्लोळ

 

पसरत आहेत चौकटी; भोवताली असलेल्या विश्वाची माझ्या,
उलगडताना ह्या बाह्य-उकली; उलगडतेय मी छटा अंतरंगाच्या,
पाडतोय कवडसे विविध दृष्टीकोनांचे; मनातील माझ्या हा नवीन आरसा,
कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा!

भुरळ घाली माझ्या मना; सुप्त गुणांच्या दाहीदिशा, 
घ्यावी उंच भरारी; इथल्या अन तिथल्या आकाशा,
धरावी कोणती वाट कळेना मजला; शंकेचा अडथळा हा धुसर असा, 
कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा!

भासते कधी कधी ही अदृश्य बेडी; पाउलखुणांवर चालावयास भाग पाडणारी,
शाबूत दृष्टीला खोचणारी असली तरीही; लोकप्रमाण मानून विस्तवात झोकणारी,
नाईलाजास्तव पाळणाऱ्या; या सवयींना धुडकावणार तरी कसा,
कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा!

उंचवावी शान म्हणुनी जगावे; कि आनंदाचा प्रकाशस्त्रोत बनण्यासाठी जगावे,
दुनियादारीच्या फंद्यात पडावे; कि चाणक्यनीतीस अवलंबवावे;
योग्य आणि अयोग्य यातही आणि त्यातही; प्रश्न हा सोडवावा तरी कसा, 
कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा!